पश्चिम बंगालमध्ये बर्फाच्या कारखान्यातून अमोनिया वायूची गळती; लहान मुलांसह 25 जणांची प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील हाडोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शापुकूर भागात रविवारी रात्री एका बर्फाच्या कारखान्यातून अमोनिया वायूची भीषण गळती झाली. या घटनेमुळे लहान मुलांसह तब्बल 25 जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. संध्याकाळच्या सुमारास बर्फाच्या कारखान्यातून अचानक अमोनिया वायू गळती सुरू झाली आणि पाहता पाहता हा वायू आसपासच्या परिसरात पसरला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना, विशेषतः महिला व लहान मुलांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रकृती अस्वस्थ वाटू लागताच बाधित नागरिकांना तातडीने स्थानिक हाड्रोवा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले, जिथे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच हाडोवा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पथकाकडून वायूची गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून, ही गॅसगळती नेमकी कशामुळे झाली याचा सखोल तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांनी कारखान्याच्या प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. हा धोकादायक कारखाना कायमचा बंद करण्यात यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी बेडाचाम्पा-हाडोवा रस्त्यावर उतरून टायर जाळले आणि वाहतूक रोखून धरली. या कारखान्यात यापूर्वीही अनेकदा गॅसगळती झाली असून, त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. भविष्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा कारखाना तात्काळ बंद करावा, अशी ठाम मागणी स्थानिकांनी लावून धरली आहे.