
चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील आरती स्वीटसमोरील पुलावरील रस्ता खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याचा मोठा भाग खचून पोकळी निर्माण झाल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे.
पुलावरील रस्ता खचल्याची माहिती स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी संबंधित विभागाला वारंवार दिली. मात्र, अद्याप या ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर नुकताच काँक्रिटचा पूर्ण पॅच टाकून दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू असून, खचलेल्या भागामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
रात्रीच्या वेळी या ठिकाणी धोका आणखी वाढत आहे. रविवारी रात्री खचलेल्या रस्त्यावरून जाताना दोन वाहनांचे टायर फुटल्याची घटना घडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, मोठी वाहने तसेच दुचाकीस्वारांना या धोकादायक ठिकाणाहून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच या परिसरात बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना सतर्क केले आहे. मात्र, ही केवळ तात्पुरती उपाययोजना असून, संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर या काळात वाहनांची मोठी वर्दळ वाढणार असल्याने खचलेल्या पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास वाहतुकीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने दखल घेऊन महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी जोर धरत आहे.




























































