
बिहारच्या मधेपुरा येथील सिंहेश्वर धाम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेत सहा भाविक जखमी झाले आहेत. सावन महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. दरम्यान, मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्दी अचानक वाढल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली. जखमींना उपचारासाठी मधेपुरा मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना सकाळी 6.25 ते 7.00 च्या दरम्यान घडली. मंदिरात प्रवेश करताना भाविकांची गर्दी अनियंत्रित झाली, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. गर्दीत चिरडून काही भाविक खाली पडले आणि जखमी झाले. गर्दीत काही महिला चिरडल्या गेल्या, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना वाचवले. जखमी भाविकांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मंदिर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासकीय पथके आधीच तैनात करण्यात आली होती. परिस्थिती अधिकच बिघडल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांना मदत केली. त्यांनी गर्दी पांगवली आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

























































