पंतप्रधान पॅकेजअंतर्गत काम करणाऱ्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना पुन्हा धमक्या, सुरक्षेत वाढ करण्याची प्रशासनाकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीर खोऱ्यात पंतप्रधान पॅकेज अंतर्गत काम करणाऱ्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा धमक्या मिळाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका धमकीच्या पत्रकानंतर ऑल पीएम पॅकेज एम्प्लॉईज फोरम काश्मीरने जम्मू आणि कश्मीर प्रशासनाकडे तातडीने सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

टाइम्स ऑफि इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सोमवारी जम्मू-कश्मीरच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात फोरमने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. २३ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेले हे धमकीचे पोस्टर युनायटेड लिबरेशन काउन्सिल नावाच्या एका संघटनेने काढल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टरमध्ये काही कर्मचाऱ्यांची नावे, त्यांचे पत्ते आणि वाहनांचे क्रमांक यांसारखी अत्यंत संवेदनशील वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. या पोस्टरच्या सत्यतेची अद्याप पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांकडून पुष्टी झालेली नाही. मात्र अशा प्रकारच्या धमक्या आणि संवेदनशील वैयक्तिक माहिती वारंवार प्रसारित होणे ही, अत्यंत चिंतेची बाब असल्याचे फोरमने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

या धमक्यांना न घाबरता खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना एका काश्मिरी पंडित कर्मचाऱ्याने सांगितले की, अशा धमक्यांमुळे ते खोरे सोडून जाणार नाहीत. “आम्ही यावेळी घाबरणार नाही आणि पळूनही जाणार नाही. काश्मीर आमचेही आहे, ती आमची जन्मभूमी आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला ठाम निर्धार व्यक्त केला.

या महिन्याच्या सुरुवातीलाही असेच एक धमकीचे पत्र समोर आले होते. त्यामुळे या धमक्यांचा स्रोत काय आहे आणि धमकी देणाऱ्यांपर्यंत कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती कशी पोहोचली, याचा सखोल तपास करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.