देशात बेरोजगारीचा दर गेल्या ४० वर्षांतील उच्चांकावर, तरुणांमध्ये मोठी निराशा; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ४० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि रोजगार निर्मितीच्या अभावामुळे तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि निराशा पसरली आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर केली आहे. नीती आयोगाच्या नुकत्याच आलेल्या धक्कादायक अहवालाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यासंदर्भात ANI ने वृत्त दिले आहे.

वन नेशन, वन इलेक्शन वरील संयुक्त समितीच्या बैठकीनंतर एएनआयशी संवाद साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या, “बेरोजगारीचा दर गेल्या ४० वर्षांत कधीही नव्हता इतका वाढला आहे. गेल्या १२ वर्षांत रोजगार निर्मिती न होणे आणि अपयशी शिक्षण व्यवस्था यामुळे तरुणांमध्ये प्रचंड हताशा आहे आणि हे आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमधून पाहिले आहे.”

केंद्र सरकारने उत्पादन आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी आणि कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले असून रोजगार देणारेच उद्ध्वस्त होत आहेत, असे त्या म्हणाल्या.