
आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दिग्गज टेनिसपटू रोहन बोपन्ना संतापला आहे. Asian Games 2026 साठी हिंदुस्थान टेनिस संघाच्या निवड प्रक्रियेत अचानक काही बदल करण्यता आले आहेत. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या अचानक झालेल्या बदलांमुळे हिंदुस्थानच्या महिला एकेरीतील अव्वल क्रमांक 1 आणि 2 असलेल्या खेळाडूंनाही फटका बसला आहे. क्रीडा मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिस संघात केवळ आशियातील ‘टॉप-8’ रँकिंगमध्ये असलेल्या खेळाडूंनाच स्थान देण्याची अट घालण्यात आली आहे.
क्रिडा मंत्रालयाच्या या नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे मानस धामणे, वैष्णवी अडकर, सहजा यमलापल्ली, वैदेही चौधरी आणि प्रार्थना थोंबारे हे खेळाडू पात्रता मिळवूनही संघात निवड होण्यापासून वंचित राहिले आहेत. या संपूर्ण प्रकारावर रोहन बोपन्ना यांनी लिंक्डइनवर पोस्ट करत म्हटले आहे की, पाच खेळाडूंनी कोणतीही शॉर्टकट किंवा कृपादृष्टी न घेता आपल्या मेहनतीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार खेळ करून हे रँकिंग मिळवले होते. आता जे लोक कधीही मैदानात उतरले नाहीत, त्यांनी प्रत्यक्षात एकही चेंडू खेळला जाण्यापूर्वीच कागदावर या खेळाडूंचे भवितव्य ठरवले आहे. जर आधीच निकाल ठरले असतील, तर मग पात्रता स्पर्धा घेण्याचा आणि रँकिंगचा उपयोगच काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बोपन्ना यांनी या निर्णयाचा फटका केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर त्यांच्या पालकांना आणि प्रायोजकांनाही बसत असल्याचे नमूद केले. हा निर्णय केवळ पाच खेळाडूंपुरता मर्यादित नसून, ज्या पालकांनी आणि प्रायोजकांनी देशाने पाठिंबा देण्यापूर्वी या खेळाडूंवर विश्वास ठेवला, त्यांना हा निर्णय कमी लेखणारा ठरतो, असे ते म्हणाले.

खेळाच्या महत्त्वावर भर देताना बोपन्ना पुढे म्हणाले की, खेळ हे एकमेव असे क्षेत्र आहे जिथे विश्वास अंदाजापेक्षा पुढे जातो आणि लिहून दिलेली स्क्रिप्ट बदलली जाते. बोर्डरूममध्ये बसून कोणी खेळायचे हे ठरवून कोणतीही क्रीडा राष्ट्र किंवा क्रीडा अर्थव्यवस्था उभी राहत नाही, असे सांगत त्यांनी या खेळाडूंना कोर्टवर येऊ देण्याची आणि त्यांच्या वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीला न्याय देण्याची मागणी केली आहे. आगामी 19 सप्टेंबर 2026 पासून जपानमधील आयेची-नागोया येथे सुरू होणाऱ्या या स्पर्धेपूर्वी हा निवड वाद चांगलाच चर्चेत आला आहे.


























































