अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीचा पर्दाफाश, अर्धा किलो सोन्याची चैन जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने सोने तस्करीचा पर्दाफाश केला आहे. शारजाहहून आलेल्या महिला डॉक्टरला अर्धा किलो सोन्यासह सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेली महिला भावनगर येथील रहिवासी असून पेशाने डॉक्टर आहे. एअर अरेबियाच्या G9-418 या विमानाने शारजाहहून अहमदाबादला आली होती. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी आणि प्रोफाइलिंग करत असताना या महिला प्रवाशाची कृती संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाने तिला थांबवून चौकशी केली.

तपासणीदरम्यान महिलेच्या हाय-नेक स्वेटरमध्ये 24 कॅरेटची एक जड सोन्याची साखळी लपवलेली आढळली. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी साखळीची तपासणी केली असता, तिचे वजन 499.540 ग्रॅम म्हणजेच जवळपास अर्धा किलो असल्याचे आढळले. जप्त केलेल्या सोन्याची बाजारातील किंमत 83,14,843 आहे. यानंतर अधिकाऱ्यांनी सीमाशुल्क कायदा, 1962 च्या संबंधित कलमांनुसार सोन्याची साखळी जप्त केली.