
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी सरकारी कार्यालयात बसून आपल्याला जाहीरपणे धमकी दिली असून, ‘मी घराबाहेर पडू शकणार नाही’, असे वक्तव्य केल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या कथित वक्तव्यावरून त्यांनी राजकारणातील पातळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
A NEW LOW in Indian politics!@SuvenduWB, while seated in a government office, has brazenly THREATENED me, publicly declaring that he will ensure I cannot even leave my home.
I call upon the Hon’ble President of India, the Hon’ble Chief Justice of India, and the people of… pic.twitter.com/MrB61dVmob
— Mamata Banerjee (@MamataOfficial) August 24, 2026
ममता बॅनर्जी यांनी सोमवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सुवेंदू अधिकारी यांच्यावर निशाणा साधला. “हिंदुस्थानच्या राजकारणातील एक नवीन नीच पातळी. सुवेंदू अधिकारी यांनी सरकारी कार्यालयात बसून मला उघडपणे धमकी दिली आहे आणि जाहीरपणे सांगितले आहे की, मी घराबाहेर पडू शकणार नाही याची ते खात्री करतील,” असा दावा त्यांनी केला. या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. “याचा अर्थ घरात नजरकैद आहे का? ही धमकी आहे का? की राजकीय छळ?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. घटनात्मक लोकशाहीमध्ये एखाद्या व्यक्तीला मुक्तपणे फिरता येईल की नाही, हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिला आहे, असा सवालही त्यांनी केला असे वृत्त आज तक ने दिले आहे.
ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाला केवळ वैयक्तिक मुद्दा न मानता लोकशाही आणि घटनात्मक अधिकारांशी जोडले. भाजपवर टीका करताना त्यांनी आरोप केला की, विरोधकांना धमकावणे, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर मर्यादा आणणे, ही देशासाठी धोकादायक परिस्थिती आहे. भारत सध्या ‘धोकादायक हुकूमशाही युगाचा’ सामना करत असल्याचा दावाही ममता यांनी केला. सत्ता काही काळासाठी लोकांना घाबरवू शकते; मात्र अखेरीस सत्ताधाऱ्यांना जनतेला उत्तर द्यावे लागते, असे त्यांनी म्हटले. “त्यांचा अहंकार मोठा आहे, पण त्यांची निराशा त्याहूनही मोठी आहे. त्यांचे दिवस मोजकेच उरले आहेत,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनीही या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला. “जेव्हा तुम्ही आदर मिळवू शकत नाही, तेव्हा तुम्ही भीती निर्माण करता,” असे म्हणत त्यांनी भाजपच्या कथित धमकीच्या राजकारणावर टीका केली.

























































