पदक हुकले, अश्रूंचा बांध फुटला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बरोबरीनंतर हिंदुस्थानी महिला निराश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदकाचे स्वप्न डोळ्यांसमोर असतानाच हिंदुस्थानी महिला संघाच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसऱया टप्प्यातील सामना गोलशून्य बरोबरीत सुटला अन् गोलसंख्येच्या निकषावर हिंदुस्थानचे उपांत्य फेरीचे तिकीट हुकले. अंतिम शिट्टी वाजताच हिंदुस्थानी खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि मैदानाबाहेर त्यांच्या चेहऱ्यांवर पराभवाची सल स्पष्ट दिसत होती.

हिंदुस्थानी संघाची अनुभवी गोलरक्षक सविता पुनिया आणि तिची सहकारी गोलरक्षक बिछू देवी यांना अश्रू आवरता आले नाहीत. पहिल्याच विश्वचषकात पदकाच्या इतक्या जवळ पोहोचलेली इशिका चौधरीही काही क्षण स्तब्ध झाली.

डोळे लाल, मनात खंत

सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट होती. संघाच्या बसची वाट पाहताना अनेक खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू होते. मुख्य प्रशिक्षक शॉर्ड मारिन यांनी माध्यमांशी संवाद साधला; मात्र त्यांनाही आपली निराशा लपवता आली नाही. संघातील वैज्ञानिक सल्लागार वेन लोम्बार्ड आणि वरिष्ठ खेळाडू पहिल्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या सहकाऱ्यांना धीर देत होते.

हिंदुस्थानी संघातील तब्बल 11 खेळाडूंचा हा पहिलाच विश्वचषक आहे. त्यामुळे उपांत्य फेरी हातातून निसटल्याचे दुःख त्यांना अधिकच बोचत होते. एका खेळाडूने आईशी फोनवर बोलताना, ‘ही सर्वोत्तम संधी होती. आम्ही इतके जवळ पोहोचलो होतो. आता अशी संधी पुन्हा कधी मिळेल माहीत नाही,’ अशी भावना व्यक्त केली.

जवळ जाऊन पदक हुकल्याची खंत

कर्णधार सलिमा टेटे हिनेही संघाची खंत स्पष्ट शब्दांत मांडली. ती म्हणाली, ‘आम्ही आनंदी नाही. पदकाच्या इतके जवळ आल्यानंतर ही संधी गमवायला नको होती. आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली. चांगला खेळ केला; पण गोल करण्यात अपयशी ठरलो. आम्ही विजयातही एकत्र आहोत आणि पराभवातही. या सामन्यातून एक मोठा धडा मिळाला. समोर आलेली कोणतीही संधी गमावायची नसते. आता पाचव्या स्थानासाठी खेळायचे आहे. आम्ही पुन्हा दमदार पुनरागमन करू. आमची झुंज अजून संपलेली नाही आणि अखेरच्या सामन्यातही ती थांबणार नाही,’ असा निर्धार सलिमा टेटेने व्यक्त केला.

पुरुषही हॉकी वर्ल्ड कपमधून बाहेर

पुरुष हॉकी विश्वचषकाच्या सामन्यात अर्जेंटिनाने हिंदुस्थानवर 5-3 असा विजय मिळवला. या पराभवामुळे हिंदुस्थानी संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला. उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी हिंदुस्थानच्या संघाला हा सामना किमान दोन गोलांच्या फरकाने जिंकणे आवश्यक होते, पण त्यांना ते जमले नाही.

सामन्याच्या 36 व्या सेकंदाला जोकिन तोस्कानीने गोल केल्यानंतर अर्जेंटिनाने आपला हल्ला सुरूच ठेवला आणि तोमास डोमेनेच्या दोन गोलांनी आपली स्थिती मजबूत केली. सामन्यादरम्यान हिंदुस्थानी खेळाडूंनी पुनरागमन करण्याचा निश्चितच प्रयत्न केला. सुखजीत सिंगने आक्रमणाचे नेतृत्व करत संघासाठी दोन गोल केले, तर हार्दिक सिंगनेही पेनल्टी स्ट्रोकचे गोलमध्ये रूपांतर करून पिछाडी कमी केली, पण अर्जेंटिनाच्या निकोलस डेला टोरे आणि लुकास टॉस्कानी यांच्या गोलमुळे विरोधी संघ आपली आघाडी कायम राखू शकला. हिंदुस्थानला आता आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी सातव्या स्थानासाठीच्या लढतीमध्ये बेल्जियमशी सामना करेल.