पत्रकारांना प्रश्न विचारू देऊ नये असे मोदींनी विनवले होते! अमेरिकी राजदूतांनी केली पोलखोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रश्नांना घाबरतात हा विरोधकांचा आरोप खरा ठरला आहे. अमेरिकेचे हिंदुस्थानातील विशेष राजदूत सर्जियो गोर यांनी एका मुलाखतीत मोदी सरकारची पोलखोल केली आहे. ‘जी-7’ राष्ट्रांच्या परिषदेसाठी फ्रान्समध्ये असताना पत्रकारांना प्रश्न विचारू देऊ नका, अशी विनवणी मोदी सरकारने आमच्याकडे केली होती, असे गोर यांनी सांगितले.

‘वर्ल्ड लीडर्स फोरम’ कार्यक्रमात गोर बोलत होते. त्यावेळी त्यांनी ‘जी-7’ दौऱयाच्या वेळी नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीतला किस्सा सांगितला. ‘या बैठकीच्या आधी व्यासपीठाच्या मागे माझी व ट्रम्प यांची चर्चा झाली. हिंदुस्थानची काही विशेष मागणी आहे का असे त्यांनी विचारले. त्यावर, मीडियाला बैठकीच्या ठिकाणी बोलवा, पण पत्रकारांचे प्रश्न घेऊ नका, अशी विनंती हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने केल्याचे मी त्यांना सांगितले. त्यांनी त्यास सहमती दर्शवली. त्यानंतर बैठक सुरू झाली.

गोर यांनी उडवली हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांची खिल्ली

सर्जियो गोर यांनी यावेळी हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘घरी असताना फावल्या वेळेत मला हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम बघायला आवडतात. जसजसा कार्यक्रम पुढे सरकतो, तो आणखी विचित्र होत जातो. संध्याकाळी 6 वाजता 8 लोक एकमेकांशी भांडत असतात. रात्री 10 वाजता 12 लोक एकाच वेळी तावातावाने बोलत असतात. त्यांच्यापैकी कुणाचेही बोलणे नीट ऐकू येत नाही. आश्चर्य म्हणजे, यापैकी कोणालाही थांबवलं जात नाही.’

  • मीडियाचे प्रतिनिधी  आले. ट्रम्पमोदींमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. बोलणे संपताच ट्रम्प कॅमेऱ्यांकडे वळले आणि काही प्रश्न आहेत का अशी विचारणा केली. त्यानंतर पत्रकारांनी भडिमार सुरू केला. त्यानंतर जे झाले ते सर्वांना माहीत आहे, असे गोर म्हणाले.

मोदी प्रश्नांना इतके का घाबरतात? काँग्रेसने डिवचले

सर्जियो गोर यांच्या खुलाशानंतर काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. ‘56 इंची छातीवाले मोदी प्रश्नांना इतके घाबरतात की, पत्रकारांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून विनवणी करतात. याच भीतीमुळे त्यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. एकदा अमेरिकेच्या ‘व्हाइट हाऊस’मध्ये पत्रकारांना सामोरे जायची वेळ आली तेव्हा त्यांना घाम फुटला होता. जीभ अडखळत होती’, अशी खोचक टीका काँग्रेसने ‘एक्स’ पोस्टच्या माध्यमातून केली.