
बोलबच्चनगिरी करून अनेक वृद्धांचा किमती ऐवज लंपास करणाऱया नरेश जयस्वाल व रमेश जयस्वाल या दोघा सराईत गुन्हेगारांच्या दादर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. प्रभादेवी मंदिरासमोरील पाटील वाडीत राहणारे चंद्रशेखर पारकर (78) हे सेवानिवृत्त असून 27 जुलै रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास परिसरातील दत्तमंदिरात पायी निघाले होते. त्यावेळी दोघांनी त्यांना रस्त्यात अडवले आणि बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि हजार रुपये त्यांच्याकडून शिताफीने काढून घेतले. आपली फसवणूक झाली हे कळताच चंद्रशेखर यांनी लगेच दादर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक बाळपृष्ण घाडीगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक राहुल वाघमारे व त्यांच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली.




























































