
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या रहिवाशांना अखेर हक्काचे घर मिळणार आहे. त्यासाठी मास्टर लिस्टद्वारे घरांच्या वितरणासाठी १ सप्टेंबरपासून पात्रता निश्चिती व ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून, २० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’ने केले आहे.
गेल्या ३० ते ४० वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, यासाठी म्हाडाच्या ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’तर्फे मास्टर लिस्टची सोडत काढण्यात येते. अरुंद भूखंड किंवा विविध आरक्षणांमुळे भूखंड बाधित झाले असल्यास जुन्या उपकरप्राप्त (Cessed) इमारतींच्या ठिकाणी पुनर्रचित इमारत बांधणे शक्य होत नाही. अशा बाधित इमारतींमधील रहिवाशांची नावे मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट केली जातात आणि त्यांना इतरत्र पुनर्रचित इमारतींमधील अतिरिक्त गाळ्यांचे वाटप मालकी तत्त्वावर केले जाते.
असा करा अर्ज:
-
मंडळातर्फे ऑनलाइन अर्ज करण्याच्या कार्यपद्धतीनुसार अर्जदारांनी म्हाडाच्या
www.mhada.gov.inया संकेतस्थळावरील ‘सिटीझन कॉर्नर’मध्ये जाऊन ‘ॲप्लिकेशन फॉर मास्टर लिस्ट’ (Application for Master List) या पर्यायावर क्लिक करून नोंदणी करावी. तसेच ही सुविधाmasterlist.mhada.gov.inया संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. -
अर्ज सादर केल्यानंतर, अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेली (Self-attested) आणि अर्जासोबत ऑनलाइन जोडलेली सर्व कागदपत्रे ३० दिवसांच्या आत कक्ष क्र. ३७२, दुसरा मजला, म्हाडा मुख्यालय, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व) येथे जमा करावीत. सुनावणीवेळी अर्जदाराने सर्व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती (Original Documents) सोबत आणणे बंधनकारक आहे.

























































