
रॅपर बादशहाने अभिनेत्री ईशा रिखीसोबत घटस्फोट जाहीर केल्यानंतर त्याचे जूने वक्तव्य चांगलेच चर्चेमध्ये आले आहे. बादशहा आणि ईशा यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे. या घोषणेनंतर बादशहाने 2024 मध्ये लग्नाच्या संकल्पनेबाबत व्यक्त केलेले विचार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
बादशहाने आणि ईशा रिखीने आपापल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक निवेदन शेअर केले. या निवेदनात त्यांनी परस्पर आदर राखून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. तसेच, या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन केले. त्यांच्या नात्याबाबत कोणत्याही प्रकारचे तर्क-वितर्क किंवा अंदाज बांधू नयेत, असेही दोघांनी सांगितले आहे.
ईशा रिखीसोबतचे बादशहाचे लग्न हे त्याचे दुसरे लग्न होते. यापूर्वी त्याने जॅस्मिन मसीहसोबत लग्न केले होते. दोघे जवळपास आठ वर्षे एकत्र होते. मात्र, २०२० मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगीही आहे. घटस्फोटाचा निर्णय जाहीर केल्यानंतर बादशहाचे 2024 मधील एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. त्यावेळी त्याने लग्नाच्या संकल्पनेवर आपले मत व्यक्त केले होते. लग्न ही एक ‘बेकार संकल्पना’ असल्याचे म्हणत त्यात काही बदल करण्याची गरज असल्याचे त्याने म्हटले होते. लग्नानंतर व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात दबाव येतो. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेताना प्रत्येकाने विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा, असे बादशहाने त्यावेळी सांगितले होते. आता ईशा रिखीसोबतच्या घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर त्याचे हे जुने वक्तव्य पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याच वर्षी मार्च महिन्यात बादशहा आणि ईशा रिखी यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ईशाची आई पूनम रिखी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या खासगी लग्नातील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोंमध्ये बादशहा आणि ईशा आनंदी दिसत होते. विशेष म्हणजे, बादशहाने स्वतः या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. मात्र, ईशाच्या आईने शेअर केलेल्या पोस्टनंतर त्यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.


























































