
‘मुंज्या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता अभय वर्मा सध्या ‘ऑपरेशन सफेद सागर’मधील भूमिकेमुळे चर्चेत आहे. मात्र, त्याचा बॉलिवूडमधील प्रवास तितका सोपा नव्हता. ‘मुंज्या’पूर्वी त्याने तब्बल 8 चित्रपट साइन केले होते; मात्र हे सर्व प्रकल्प कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रखडले. तरीही या अपयशामुळे खचून न जाता अभयने देवाच्या नियोजनावर विश्वास ठेवला.
अभयने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘मुंज्या’पूर्वी सुमारे आठ चित्रपट असे होते, जे प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत. मात्र, त्या काळातही त्याला देवाची साथ मिळत असल्याची भावना होती. “माझा नेहमीच देवाच्या नियोजनावर विश्वास राहिला आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्षात आल्या नाहीत, त्या काळातही देवाने मला खूप मदत केली आणि माझ्यावर कृपा केली. त्यामुळे मी केवळ कृतज्ञ आहे. माझा विश्वास आहे की देव माझ्या पाठीशी आहे आणि सर्व काही योग्य वेळी घडेल,” असे अभयने म्हटले.
अभयच्या मते, प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते आणि प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते. त्यामुळे तो करिअरच्या निकालापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो. “मी केवळ माझ्या नशिबाचे आभार मानतोय आणि या सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी येते आणि जाते आणि त्यामागे काहीतरी कारण असते. मी शांतपणे माझे काम करतो आणि दररोज सर्वोत्तम प्रयत्न करतो,” असे त्याने सांगितले. आपल्या प्रवासातून एखाद्या नवोदिताला प्रेरणा मिळावी, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनी मुंबईत येऊन स्वतःसाठी अभिनय क्षेत्र निवडावे, असेही त्याला वाटते.
अभिनयाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही अभयने स्पष्ट केला. त्याच्या मते, अभिनेता होण्यापूर्वी चांगला माणूस असणे महत्त्वाचे आहे. “स्वतःचा शोध घेणे आणि कामाच्या ठिकाणी तसेच एक माणूस म्हणून दररोज अधिक चांगले बनणे, हेच माझे ध्येय आहे. एक चांगला माणूस असणे ही पहिली गोष्ट आहे आणि त्यानंतर काम आपोआप घडत जाते. तुम्ही चांगले माणूस असाल तर आपोआप चांगले अभिनेतेही बनता. कारण तुम्ही अधिक गोष्टी अनुभवता, अधिक दयाळू होता आणि अधिक काहीतरी मिळवता,” असे अभयने म्हटले.
अभयने अभिनयाच्या यशापेक्षा प्रक्रियेला अधिक महत्त्व दिले आहे. सेटवर पूर्ण क्षमतेने काम करणे, दिग्दर्शकांचे ऐकणे आणि प्रत्येक भूमिकेत सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करणे, हीच त्याची पद्धत आहे. ‘मुंज्या’नंतर अभय वर्माच्या हातात सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’मध्ये तो शाहरुख खान आणि सुहाना खानसोबत दिसणार आहे. याशिवाय राशा थडानीसोबत ‘लायकी लायका’, शनाया कपूरसोबत ‘जेकब कार्डोसो’, तसेच हंसल मेहता यांचा ‘दिलकशी’आणि लिजो जोस पेलिसेरी यांचा आगामी चित्रपटामध्ये तो व्यस्त आहे.




























































