दिवाळीत राम- रहमान येणार समोरासमोर, रणबीरच्या ‘रामायण’ समोर ‘मूनवाॅक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आता अभिनयाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवणार आहेत. रहमान यांचा अभिनयातील पदार्पणाचा चित्रपट ‘मूनवॉक’यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याच काळात रणबीर कपूरचा बहुप्रतीक्षित ‘रामायण: भाग 1’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत बॉक्स ऑफिसवर या दोन चित्रपटांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक मनोज एन. एस. यांच्या ‘मूनवॉक’मध्ये प्रभूदेवा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी बुधवारी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शनाची घोषणा केली. मात्र, चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होत आहे ती ए. आर. रहमान यांच्या अभिनय पदार्पणामुळे.

ए. आर. रहमान केवळ अभिनयच करणार नाहीत, तर त्यांनी ‘मूनवॉक’ला संगीतही दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटात ते एका मजेशीर भूमिकेत दिसणार आहेत. मूनवॉक’मध्ये प्रभूदेवा यांच्यासोबत योगी बाबू, अजू वर्गीस, अर्जुन अशोकन, सॅट्झ, निश्मा, सुष्मिता, रेडिन किंग्सले, मोट्टाई राजेंद्रन यांच्यासह अनेक कलाकार आहेत. विशेष म्हणजे योगी बाबू तब्बल 16 वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपटातील ‘येथू’, ‘टिंगा’ आणि ‘मकारेना’ही तीन गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ए. आर. रहमान आणि प्रभूदेवा यांच्यावर चित्रित झालेले ‘मयिले’ हे गाणेही लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘मूनवॉक’मध्ये विनोद, संगीत आणि नृत्याचा मेळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट कौटुंबिक मनोरंजनाचा अनुभव देईल, असा निर्मात्यांचा दावा आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरच्या ‘रामायण: भाग1’चीही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. दिवाळीच्या काळात दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांसमोर दोन वेगळ्या धाटणीचे पर्याय असतील.