
कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या बेपर्वा आणि निष्काळजी कारभारामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रेल्वे स्थानकांवर गाड्यांमध्ये पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा अत्यंत जुनाट, कालबाह्य आणि गळकी झाली असून त्यामुळे दररोज हजारो लिटर शुद्ध पिण्याचे पाणी थेट रुळांवर वाहून वाया जात आहे. तरीही रेल्वे प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांसह सामाजिक कार्यकर्त्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कुडाळ अशा जवळपास सर्वच प्रमुख स्थानकांवर हीच परिस्थिती आहे. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या स्थानकात थांबतात तेव्हा डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून जाड पाईपचा वापर केला जातो. हे पाईप अनेक वर्षांपूर्वीचे असून अनेक ठिकाणी फाटलेले, तुटलेले आणि गळके झाले आहेत.
पाईपचे जॉईंट निखळलेले आहेत. त्यामुळे पाणी भरताना अर्धे पाणी डब्याच्या टाकीत जातच नाही, तर अर्ध्याहून अधिक पाणी पाईपच्या छिद्रांमधून आणि जोडांमधून बाहेर पडून प्लॅटफॉर्मवर आणि रुळांवर वाहत असते. एक गाडी भरून जाईपर्यंत शेकडो लिटर पाणी वाया जाते. दिवसभरात अशा 30 ते 40 गाड्या येत-जात असतात. त्यामुळे दररोज एका स्थानकावर किमान 5 ते 10 हजार लिटर पाणी वाया जात असल्याचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे हे पाणी सर्वसामान्य पाणी नसून फिल्टर केलेले शुद्ध पिण्याचे पाणी असते. रेल्वे प्रशासन प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर लाखो रुपये खर्च करते. तेच पाणी निष्काळजीपणामुळे वाया घालवले जात आहे. एकीकडे कोकणातच उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीत रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची अशी उधळपट्टी होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.

























































