गणपतीमध्ये मेट्रो मध्यरात्रीपर्यंत धावणार, उशिरापर्यंत प्रवासाचे ‘नो टेंशन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवात प्रवासादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एमएमआरसीने मेट्रो मध्यरात्रीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिकेच्या सेवा कालावधीत 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान मध्यरात्री बारापर्यंत मेट्रो चालवली जाणार आहे.

गणेशोत्सवात दक्षिण मुंबई तसेच उपनगरातील गणेश मंडळांना भेट देऊन दर्शन घेण्यासाठी मुंबईकर मोठय़ा संख्येने बाहेर पडतात. रात्री उशिरा घरी परतताना प्रवाशांची असुविधा होऊ नये यासाठी मेट्रोचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने घेतला आहे. सिद्धिविनायक मंदिरासह दादर, प्रभादेवी, वरळी, महालक्ष्मी आणि गिरगावसारख्या परिसरातील गणेश मंडळांना भेट देणाऱयांची संख्या मोठी असते. त्यामुळे या ठिकाणी जाणाऱया-येणाऱया भाविकांना मेट्रो 3 च्या वाढीव फेऱयांमुळे दिलासा मिळणार आहे. नियमीत वेळापत्रकानुसार मेट्रो 3 मार्गिकेवरील कफ परेड-आरे जेव्हीएलआर या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता सुटते. मात्र, गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो उशिरापर्यंत म्हणजेच मध्यरात्री 12 वाजेपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली.

मेट्रोत गणपती बाप्पा मोरया

रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेसमधून गणेशमूर्ती इच्छित स्थळी नेल्या जातात त्या पार्श्वभूमीवर एमएमआरसीएनेदेखील गणेशमूर्तींसह भाविकांना मेट्रोने प्रवास करण्याची मुभा दिली आहे. 18 इंच उंचीच्या गणेशमूर्तींसह भाविकांना मेट्रो 3 मार्गिकेवरून प्रवास करता येणार आहे. भाविकांना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे लागणार असून मेट्रो स्थानकातील प्रवेशद्वारावर गणेशमूर्तींची स्क्रिनिंग मशीनमध्ये तपासणी केल्यानंतरच मेट्रोतून मूर्तीसह प्रवास करता येणार आहे.