
उत्सव मोठा करण्यापेक्षा माणुसकी मोठी करण्याचा आदर्श कोपरगावातील संजीवनी युवा प्रतिष्ठानने यंदाच्या दहीहंडी उत्सवातून दाखवून दिला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर होणारी मानाची दहीहंडी भव्य स्वरूपात साजरी न करता साध्या पद्धतीने साजरी केली. या दहिहंडीच्या भव्य आयोजनावर होणाऱ्या खर्चाची रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत जमा करण्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेतला.
देशातील विविध भागांत नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिक संकटात असताना, जल्लोषावर खर्च करण्याऐवजी आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी हातभार लावण्याची सामाजिक जाणीव या निर्णयातून व्यक्त होत आहे. शनिवारी (दि. 5) सायंकाळी 6.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते मानाची दहीहंडी फोडण्यात आली. या दहिहंडी सोहळय़ासाठी कोपरगावकरांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.
26 ऑगस्टला नेपाळमध्ये निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठी जीवित व वित्तहानी झाल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी ‘उत्सवापेक्षा माणुसकी मोठी’ या भावनेतून घेतलेला हा निर्णय केवळ दहीहंडीपुरता मर्यादित नसून, उत्सव आणि सामाजिक दायित्व यांची सांगड घालणारा संदेश देणारा आहे.
संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. त्यामुळे आज झालेल्या दहिहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
अचानक घेतलेली भूमिका नसून, बांधिलकीची परंपरा
- 2019 कोल्हापूर-सांगली महापुराच्या वेळी दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करून बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात आली होती.
- 2021 कोरोना संकट काळात दहीहंडी प्रातिनिधिक स्वरूपात साजरी
- प्रतिष्ठानच्या माध्यमातून 500 बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्यात आले होते.
- तर 2023 दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मोठय़ा स्वरूपातील दहीहंडी रद्द करून पर्जन्य यागाचे आयोजन करण्यात आले होते.




























































