मराठा समाज आक्रमक; धुळे-सोलापूर महामार्ग रोखला, मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच; पाणी आणि उपचार नाकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धुळे -सोलापूर महामार्गावर मराठा समाजाने आज दोन वेळा रास्ता रोको आंदोलन केले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी पाणी आणि वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. त्यामुळे आज मराठा समाज आक्रमक झाला असून, धुळे-सोलापूर महामार्ग मराठा आंदोलकांनी आज दिवसभर रोखत हलगीच्या तालावर नृत्य, लेझीम खेळत, महिलांनीही फुगडी, लेझीम खेळत रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या मागण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी केली.

आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आंतरवाली सराटी येथे येत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जलप्राशन करण्याची तसेच उपचार करण्यासाठी विनंती केली. या विनंतीला मान देत दोन उपचार घेतले. पुन्हा दोन दिवसांपासून उपचार पाणी घेणे बंद केले यामुळे तब्येत खालावत चालली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून, त्यांनी सलाईन आणि उपचार घेण्यास बंद केल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. उपोषणाला नऊ दिवस उलटूनही सरकारकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याने मराठा समाजामध्ये नाराजी वाढत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. सरकारने तातडीने मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

वडीगोद्री येथील पुलावर आंदोलकांनी एकत्र येत महामार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. आंदोलकांनी घोषणाबाजी करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस असल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतही मराठा समाजात चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारने वेळ न दवडता आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात येत आहे. सरकारकडून निर्णय न झाल्यास आगामी काळात आंदोलनाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज दोन्ही वेळी मराठा समन्वयकांनी मध्यस्थी करत रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.