
नाव रस्त्याला देऊन, चौकात पुतळा उभारून किंवा एखादा नामफलक लावून महान खेळाडूची स्मृती जिवंत राहत नाही. त्यांचा खेळ, विचार आणि वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे! राष्ट्रीय कबड्डीपटू आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तारक राऊळ यांच्या शोकसभेत याच भावनेला मूर्त रूप देणारी मागणी पुढे आली. प्रभादेवीत तारक राऊळ यांच्या नावाने स्वतंत्र कबड्डी क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी माजी महापौर विशाखा राऊत यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील कबड्डीमहर्षी बुवा साळवी सभागृहात आयोजित शोकसभेत तारक राऊळ यांच्या कार्याला विविध मान्यवरांनी उजाळा दिला. विशाखा राऊत यांनी प्रभादेवीतील क्रीडा मैदानाचा उपयोग करून तारक राऊळ यांचे नाव पुढे नेण्याची भूमिका मांडली. माजी महापौर श्रद्धा जाधव यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. विभागीय आमदारांनी प्रभादेवीतील चवन्नी गल्ली क्रीडांगणाबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आमदार भाई जगताप यांनी मात्र यापुढे जात ‘तारकांना चौक-रस्त्यात अडकवू नका,’ अशी भूमिका घेत त्यांच्या कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
आमदार सुनील शिंदे यांनी लोअर परळ येथील मैदानाला तारक राऊळ यांचे नाव देण्याची तयारी दर्शवतानाच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव, राजू भावसार आणि अशोक शिंदे यांनी तारकांच्या खेळातील बारकावे, मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा दिला. तारकांनी आपले कबड्डीचे ज्ञान नवोदितांना दिले आणि बुवा साळवींसोबत कबड्डीला सातासमुद्रापार नेण्यात मोलाची भूमिका बजावली, असे बाबूराव चांदेरे यांनी नमूद केले.
तारक राऊळ यांच्या स्मृती जपण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्यासारखे खेळाडू घडविण्यासाठी मैदान, सुविधा आणि प्रशिक्षणाची दारे खुली करणे. ‘तारक राऊळ क्रीडा संकुल’ उभे राहिले तर ते केवळ एका महान खेळाडूचे स्मारक नसेल. महाराष्ट्राच्या कबड्डी परंपरेला पुढे नेणारे जिवंत पेंद्र ठरेल, या क्रीडा दृष्टिकोनाने तारक राऊळ यांच्या स्मृतींना वंदन करत आदरांजली वाहण्यात आली.



























































