अहिल्यानगरात लेझर, प्लाझ्माला बंदी! जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये लेझर लाईट आणि प्लाझ्माचा वापर शंभर टक्के नकोच. तशा सूचना यापूर्वी झालेल्या बैठकीत देण्यात आल्या असून, त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक आदेशही दिलेले आहेत. त्यामुळे अहिल्यानगरमधील गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार यंदाचा गणेशोत्सव ध्वनिप्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिली. नवीननगर रोडवरील यशवंतराव चव्हाण मध्यवर्ती प्रशासकीय भवनातील प्रांताधिकारी कार्यालयात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक झाली.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करून ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनालाही याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, गणेशोत्सव मंडळांसोबत बैठका घेऊन त्यांना नियमांची माहिती देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यंदा ध्वनिप्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची व जिल्ह्याची नवी ओळख निर्माण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. गणेशोत्सव मंडळांनीही प्रशासनाला सहकार्य करावे. मंडळांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्यांचाही योग्य पद्धतीने विचार केला जाईल. ग्रामपंचायती तसेच नगरपरिषदांच्या स्तरावरही बैठका घेण्यात आल्या आहेत. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या मार्गावर आवश्यक प्रकाशव्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आदी बाबींवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत. मिरवणूक मार्गावरील आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करा

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीच्या वापरास विरोध वाढू लागला आहे. शहरात विश्व हिंदू परिषद, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसद या तीन संघटनांनी डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमला विरोध दर्शवला आहे. गणेशोत्सव डीजेमुक्त साजरा करा. त्यासाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करा, असे आवाहन संघटनांनी गणेश मंडळांना केले आहे.