भाजप नगरसेवकांच्या दांडीने पक्षाची लक्तरे वेशीवर! बेफिकिरी महागात पडू शकते, आमदार राम सातपुतेंचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीला मोठय़ा संख्येने नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे पक्षाची लक्तरे आणि अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे. नगरसेवकांची अनुपस्थिती पाहून ‘पक्षाच्या चिन्हावर नगरसेवक आणि पदाधिकारी झाल्यानंतर पक्षाच्या बैठकीला गांभीर्याने उपस्थित राहता येत नसेल, तर कार्यकर्तेपणाचा अर्थ काय,’ असा संताप व्यक्त करत, ‘सत्तेची ताकद, पदांची मस्ती आणि बैठकीतील बेफिकिरी भाजपला महागात पडू शकते,’ असा स्पष्ट इशाराच आमदार राम सातपुते यांनी दिला.

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याध्यक्ष दिलीप बालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, आमदार राम सातपुते, माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. यावेळी अनेक नगरसेवक बैठकीला गैरहजर होते.

पक्षाच्या बैठका म्हणजे केवळ हजेरी लावून निघून जाण्याचे व्यासपीठ नाही, तर संघटनेच्या वाटचालीवर चिंतन करण्याचे ठिकाण आहे, असे सांगत राम सातपुते म्हणाले, पक्षाच्या चिन्हामुळेच आपण नगरसेवक झालो, पदाधिकारी झालो आणि आपली राजकीय ओळख निर्माण झाली, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. पद मिळाल्यानंतर पक्षापेक्षा व्यक्ती मोठी झाली, अशी भावना निर्माण होणे, ही संघटनेसाठी धोक्याची घंटा आहे, असे ते म्हणाले. बैठकीत काही कार्यकर्ते आमदारांसोबत आले आणि काही वेळाने आमदारांसोबतच निघून गेले. काहीजण परत आलेच नाहीत. पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत अशाप्रकारे कार्यकर्त्यांचे येणे-जाणे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करत संघटना कमजोर झाली तर मोठमोठी राजकीय साम्राज्येही कोसळू शकतात, असा सूचक इशारा राम सातपुते यांनी दिला.

सातपुते यांच्या वक्तव्यामुळे भाजप जिल्हा संघटनेतील अंतर्गत शिस्त, पदाधिकारी-कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि पक्षाच्या बैठकींकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. आमदार राम सातपुते यांनी दिलेल्या या ‘घरच्या आहेरा’नंतर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी आणि नगरसेवक आत्मपरीक्षण करणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

पदासाठी काम करू नका – सुजय विखे

पदाच्या मागे धावण्यापेक्षा पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता उभा करा, असा मंत्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत दिला. ‘राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि मी शेवटी’ या मूलमंत्राची आठवण करून देताना व्यक्तिगत निष्ठेपेक्षा पक्षनिष्ठेला प्राधान्य द्या, असे त्यांनी स्पष्ट केले. पद मिळाले म्हणजे काम संपले नाही; उलट पक्षासाठी सक्रिय होण्याची जबाबदारी वाढते, असा स्पष्ट इशारा विखे यांनी दिला. दरम्यान, अहिल्यानगरच्या हक्काच्या पाण्यासाठी आता माघार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. डिंभे–माणिकडोह बोगदा, कुकडी कालव्यांचे नूतनीकरण आणि साकलाई योजनेचा उल्लेख करत पाण्याचा प्रश्न निर्णायक टप्प्यावर नेण्याचा दावा त्यांनी केला.