
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱया हिंजवडी परिसरात होणारी वाहतूककोंडी, मेट्रोला होत असलेला विलंब, रस्त्यावरील खड्डे, याबरोबरच फुटपाथ, कचरा, पिण्याचे पाणी, सांडपाणी, यासारख्या मूलभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. या समस्यांकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ रविवारी आयटीयन्ससह तमाम हिंजवडीकरांनी मूक मोर्चा काढत आपला प्रक्षोभ दाखवून दिला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत या मोर्चात हिरीरीने सहभाग घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळत मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मोर्चाच्या अग्रस्थानी सुमारे 500 महिला होत्या. मध्यभागी स्थानिक ग्रामस्थ आणि त्यानंतर सर्व आयटीयन्स असे मोर्चाचे स्वरूप होते. यावेळी शिवसेना सचिव सूरज चव्हाण, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन पडवळ, पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, रामदास धनवटे, पुणे शहरप्रमुख वसंत मोरे, पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख चेतन पवार, सहसंपर्कप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे आदी उपस्थित होते.
समस्या सोडविण्यासाठी आवाज उठविणार
फेज वन इन्पहसिस सर्कल येथे आंदोलनाची सांगता झाली. सर्कलजवळ आदित्य ठाकरे येताच मोर्चातील आंदोलकांनी त्यांच्याभोवती गराडा घातला आणि आपल्या समस्या मांडण्यास सुरुवात केली. आयटीयन्ससह सोसायटीधारक आणि स्थानिक ग्रामस्थांनीही भेडसावणाऱया विविध अडीअडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला. वाहतूककाsंडी, रस्त्यावरील खड्डे, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह इतर पायाभूत सुविधांबाबत नागरिकांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. आदित्य ठाकरे यांनीही सर्व समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठविण्याची ग्वाही दिली.
टॅक्स भरूनही चांगले रस्ते मिळत नाहीत हे दुर्दैव
खड्ड्यामुळे जाणारे जीव, वाहतुकीची काsंडी आणि पायाभूत सुविधांची वानवा याला पंटाळून पुण्याच्या हिंजवडी-माण-मारुंजी परिसरातील नागरिक आज रस्त्यावर उतरले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही त्या मोर्चात सहभागी होऊन महायुती सरकारवर टीका केली. सर्वसामान्यांना टॅक्स भरूनही चांगले रस्ते मिळत नाहीत हे दुर्दैव आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
पुण्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी, हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये रस्त्यांसाठी, अस्वच्छतेसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो आणि भांडावे लागते, हे दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त केली.
हिंजवडी मेट्रो लवकरात लवकर सुरू करा
हिंजवडी मेट्रोचे काम पूर्ण असताना केवळ उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याने ते रखडवले जात आहे, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी ठरवले तर हे सगळे विषय एका आठवडय़ात संपू शकतात. मेट्रोसाठी फित कापायची गरज नाही, लोकांसाठी या सेवा लवकरात लवकर सुरू करा, नंतर तुम्हाला बॅनर, हार्ंडग लावून जे काही श्रेय घ्यायचे असेल ते घ्या, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
डीजेबाबत सर्वमान्य निर्णय घ्या
डीजेविरोधात पुणेकरांनी काढलेल्या मोर्चाबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, राजकीय मंडळे आणि कार्यकर्त्यांच्या पलीकडे जाऊन पुणेकरांचा, स्थानिक जनतेचाही आवाज यासंदर्भात ऐकून घेणे गरजेचे आहे. एका मतदारसंघात सर्व काही सुरू असते आणि दुसरीकडे त्यावरच पोलिसांची बंदी येते, राज्य सरकारने सगळय़ांना मान्य होईल असा एक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

























































