मुंबई-पुणे तिसऱ्या द्रुतगती महामार्गाचे काम लांबणीवर, भूसंपादन आणि परवानग्या अडकल्याने एनएचएआयकडून निविदेला मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि पुण्यादरम्यान प्रस्तावित असलेल्या तिसऱया द्रुतगती महामार्गाचे काम पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. महामार्गाच्या पागोटे ते चौक या पहिल्या टप्प्याच्या बांधकाम निविदेला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) वारंवार मुदतवाढ दिली जात असल्याने प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब होत आहे. भूसंपादन प्रक्रिया आणि पर्यावरणाशी संबंधित आवश्यक परवानग्या न मिळाल्याने कामाला विलंब होत असल्याचे मुख्य कारण समोर आले आहे.

पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्गाचा मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार असून, त्या अंतर्गत पुणे-मुंबई असा तिसरा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत अटल सेतू-चौक-शिवारे ते पुणे असा एकूण 130 किलोमीटरचा तिसरा द्रुतगती महामार्ग उभारण्यात येत आहे. हा संपूर्ण प्रकल्प दोन टप्प्यांत राबवला जाणार असून, त्यात पागोटे ते चौक असा 30 किलोमीटरचा पहिला टप्पा आणि चौक ते शिवारे असा 100 किलोमीटरचा दुसरा टप्पा समाविष्ट आहे. मात्र एनएचएआयच्या नियमांनुसार प्रकल्पासाठी जोपर्यंत 90 टक्के भूसंपादन होत नाही आणि पर्यावरणासंबंधीच्या परवानग्या मिळत नाहीत, तोपर्यंत या प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात होणार नसल्याचे सांगत एनएचएआयने निविदेला मुदतवाढ दिली आहे. आता 1 ऑक्टोबरला निविदा खुली होण्याची शक्यता आहे.

तारीख पे तारीख

पागोटे ते चौक या पहिल्या टप्प्यासाठी 2024 मध्ये प्रथम निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ती रद्द करून ऑगस्ट 2025 मध्ये नव्याने निविदा काढण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत या निविदेला तारीख पे तारीख मिळत असून 15 हून अधिक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. अटींची पूर्तता अद्याप न झाल्यामुळे निविदा प्रक्रिया अंतिम टप्पात पोहोचू शकलेली नसल्याचे एनएचएआयचे प्रादेशिक व्यवस्थापक अंशूमाली श्रीवास्तव यांनी सांगितले.