
हिंदुस्थानात ऐतिहासिकदृष्ट्या गिधाडांचे वास्तव्य आणि घरटी आढळत असलेल्या सुमारे 72 टक्के ठिकाणांवरून ही गिधाडे आता गायब झाली आहेत. गिधाडांच्या संख्येत झालेली ही मोठी घट भरून काढण्यासाठी जंगलातील गिधाडांच्या प्रजातींचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने सातत्याने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी देशभरात ‘व्हल्चर सेफ झोन’ (गिधाड सुरक्षित क्षेत्रे) तयार करण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी केले.
निसर्गातील अत्यंत कार्यक्षम मृतभक्षक (scavenger) म्हणून गिधाडांची ओळख आहे. मात्र, 1990च्या दशकापासून देशातील गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यांच्या अन्नसाखळीत झालेला व्यत्यय तसेच पशुधनावर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे डायक्लोफेनाक हे दाहशामक औषध गिधाडांच्या घटत्या संख्येचे प्रमुख कारण ठरले.
पशुधनाला डायक्लोफेनाक हे औषध दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या शवांवर गिधाडे ताव मारत. अशा जनावरांचे मृतदेह खाल्ल्याने गिधाडांच्या शरीरावर औषधाचा घातक परिणाम होत असे. वैज्ञानिक संशोधनातून डायक्लोफेनाकमुळे गिधाडांच्या मूत्रपिंड निकामी होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे.
गिधाडांचे संवर्धन आणि त्यांच्या संख्येतील घट थांबवण्यासाठी सुरक्षित पशुवैद्यकीय पद्धतींचा अवलंब करणे, गिधाडांना सुरक्षित अन्न उपलब्ध होईल याची खात्री करणे आणि संबंधित घटकांची तांत्रिक क्षमता वाढवणे आवश्यक असल्याचे यादव यांनी सांगितले.
गिधाडांच्या संवर्धनासाठी पशुवैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक, पशुधन मालक, स्थानिक प्रशासन आणि स्थानिक समुदाय यांनी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच पशुधनाच्या मृतदेहांचे सुरक्षित व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
गिधाडांच्या सुरक्षित अधिवासासाठी आणि त्यांच्या जंगलातील प्रजातींच्या पुनरुज्जीवनासाठी ‘व्हल्चर सेफ झोन’ची निर्मिती, सुरक्षित पशुवैद्यकीय पद्धती, सुरक्षित अन्नाची उपलब्धता आणि मृत जनावरांच्या शवांचे योग्य व्यवस्थापन या उपाययोजना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

























































