
नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांविरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान चर्चेत आलेली अभिनेत्री आणि मॉडेल रिया अहिर हिला ‘बिग बॉस 20 ’च्या घरात प्रवेश मिळू शकला नाही. रिया अहिर आणि पंजाबी अभिनेत्री लव गिल यांच्यात घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत प्रेक्षकांनी लव गिलला पसंती दिली. त्यामुळे रियाला ‘बिग बॉस’च्या मंचावरूनच माघारी परतावे लागले. नीट आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विद्यार्थ्यांची व्हॅन रस्त्यात अडवल्यानंतर रिया अहिर देशभरात अवघ्या काही सेकंदामध्ये चर्चेमध्ये आली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
ती तरुणांमध्ये तर लोकप्रिय झालीच. तसेच तिला विविध माध्यमांनीही उचलून धरले. तरुणांचा आवाज म्हणून ती यानंतर ओळखली जाऊ लागली. रियाचे नाव ‘बिग बॉस 20 ’साठी चर्चेत आले. परंतु हा निर्णय प्रेक्षकांवर सोपवण्यात आला होता. निर्मात्यांकडून रिया आणि लव गिल यापैकी एकालाच शोमध्ये प्रवेश द्यायचा होता. 6 सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात आला. या निकालांतर्गत जनतेने लव गिलच्या बाजूने कौल दिला. त्यामुळेच आता ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याचे रियाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे.
रियाला ‘बिग बॉस’च्या मंचावर येण्याची आणि सलमान खानची भेट घेण्याची संधी मिळाली. मात्र, घरात प्रवेश करण्यापूर्वीच तिला बाहेर पडावे लागले. मंचावर रिया आणि लव गिल यांच्यात काही वेळ वादही झाला. रियाने आपल्या बेधडक शैलीत भूमिका मांडत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. असे वृत्त आज तक ने दिले आहे.
रिया अहिर ही 27 वर्षीय मॉडेल असून, काही काळापूर्वी विद्यार्थी आंदोलनादरम्यान ती चर्चेत आली होती. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपावरून मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांना पोलीस घेऊन जात असताना तिने पोलिसांच्या वाहनाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला होता. तिचे हे दृश्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.




























































