
नरेंद्र मोदी सरकार इस्रोला (ISRO) कमकुवत करत असून देशाचे अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केला.
हिंदुस्थानचा अंतराळ कार्यक्रम हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीचा आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. वैज्ञानिकांवर विश्वास ठेवणे, त्यांना आवश्यक संसाधने उपलब्ध करून देणे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांसारख्या संस्थांची उभारणी करण्यास त्यांनी मदत केली, असेही ते म्हणाले. “आज मोदी सरकार हा वारसा शांतपणे खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याच्या प्रयत्नात आहे,” असा आरोप गेहलोत यांनी केला.
इस्रोच्या नऊ कर्मचारी संघटनांनी 4 सप्टेंबर रोजी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांना पत्र लिहून संस्थेची उत्पादन आणि दैनंदिन कार्याशी संबंधित कामे खासगी संस्थांकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाबाबत अधिकृत स्पष्टीकरण मागितले होते. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
काँग्रेसच्या काळातील संस्थांना कमकुवत केल्याचा आरोप
मोदी सरकारने सत्तेतील 12 वर्षांच्या काळात एकही नवीन राष्ट्रीय संस्था उभारलेली नाही, असा दावा गेहलोत यांनी केला. उलट, काँग्रेस सरकारच्या काळात स्थापन झालेल्या संस्थांना पद्धतशीरपणे कमकुवत करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
“आता इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेची पाळी आली आहे. इस्रोचे कर्मचारी स्वतः सरकारकडून उत्तर मागण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत,” असे गेहलोत म्हणाले.
सरकारची इस्रोबाबतची भूमिका केवळ एका संस्थेवरील हल्ला नसून देशाच्या वैज्ञानिक स्वाभिमानावर आघात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
“स्वतः काहीही उभारू न शकणारे सरकार काँग्रेसच्या काळात निर्माण झालेल्या राष्ट्रीय संपत्तीची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे,” अशी टीका गेहलोत यांनी केली.
इस्रोचे स्पष्टीकरण
दरम्यान, इस्रोने रविवारी आपल्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण देताना संस्थेचे खासगीकरण होणार नसल्याचे आणि इस्रोचे महत्त्व कमी केले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
खासगी क्षेत्राच्या सहभागामुळे इस्रोला हिंदुस्थानच्या अंतराळ कार्यक्रमाच्या पुढील पिढीवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. त्याचवेळी खासगी उद्योगांना प्रस्थापित तंत्रज्ञान आणि क्षमता मोठ्या प्रमाणावर विकसित करण्याची संधी मिळेल, असे इस्रोने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

























































