
अमरावती जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांत तीन जणांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात वन विभागाच्या पथकाला अखेर यश आले. शिरजगाव कसबानजीक सोमवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केला होता. त्यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वन विभागाच्या पथकाने शोधमोहीम तीव्र केली होती. शिरजगाव कसबा येथील एका शेतातून या वाघिणीला जेरबंद करण्यात आले.
रविवारी सायंकाळी वाघिणीने सोनोरी येथील शेतशिवारात एका 18 वर्षीय तरुणीवर हल्ला करून तिला ठार केले होते. तसेच चांदूर बाजार तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी मार्गक्रमण करीत असलेल्या वाघिणीने सोमवारी शिरजगाव कसबा नजीक शेतात शेतकऱ्यावर हल्ला केला होता. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्याच्या घटना वाढल्याने वनविभागाकडून ड्रोनच्या सहाय्याने वाघिणीचा शोध सुरू होता. पुणे येथील रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे पशुवैद्यक डॉ. हेमराज यांनी वाघिणीला यशस्वीपणे डार्ट करून बेशुद्ध केले. त्यानंतर वाघिणीला पिंजऱ्यात टाकण्यात आले. या वाघिणीला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला, अशी माहिती उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी दिली.

























































