सात दशकांची परंपरा मोडीत निघणार, पुरस्कार सोहळाही गुजरातला पळवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सात दशकांपासून दिल्लीत होत आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा पहिल्यांदा मोडीत निघणार असून 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण गुजरातमधील एकता नगर येथे ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या भव्य परिसरात होणार असल्याचे वृत्त आहे.

1954 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात झाली. पहिला पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे झाला होता. त्यानंतर अनेक दशकांपासून या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन राजधानी दिल्लीमध्ये होत आहे. त्यामुळे यंदाचा सोहळा गुजरातमध्ये करण्याचा निर्णय ऐतिहासिक मानला जात आहे. वृत्तानुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 23 सप्टेंबर रोजी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. त्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील आणि त्यानंतर पदरा येथील ब्रह्माकुमारीजच्या कार्यक्रमात भाग घेतील. याच दौऱ्यात त्या एकता नगरला जाण्याचीही शक्यता आहे, जिथे त्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करू शकतात. गेल्या सात दशकांहून अधिक काळ दिल्लीशी जोडलेली ही परंपरा मोडून हा सोहळा गुजरातला होणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा जुलै महिन्यात नवी दिल्ली येथे करण्यात आली. यात ‘आर्टिकल 370’ सर्वेत्कृष्ट चित्रपट ठरला. ‘आर्टिकल 370’ मधील दमदार अभिनयासाठी यामी गौतम सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘ब्रह्मयुगम’साठी ममुटी आणि ‘चंदू चॅम्पियन’साठी कार्तिक आर्यन यांना विभागून देण्यात येणार आहे.

काय काय पळवले…

  1. 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला गेला.
  2. मार्च 2026 मध्ये टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना तसेच आयपीएल 2026चा अंतिम सामनादेखील याच स्टेडियमवर झाला.
  3. 2024 आणि 2025मध्ये 70 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अहमदाबाद येथे पार पडला होता.
  4. 2030ची राष्ट्रकुल स्पर्धा आणि 2036ची ऑलिम्पिक स्पर्धादेखील गुजरातला होणार आहे.