
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक झाली आहे. या प्रकरणी हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात सोमवारी मोर्चा काढून एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबरोबरच आयोगाचा कारभार सुधारण्याची मागणी केली. यावर बोलताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ”. आज लोकसेवा आयोगाचं पूर्णपणे अध:पतन झालेलं आहे. सध्याची लोकसेवा आयोगाची जी रचना आहे ती अत्यंत राजकीय स्वरुपाची आहे. संविधानिक संस्थांमध्ये मुख्यमंत्री राजकीय व आपल्या मर्जीतील माणसं घुसवण्याचं काम बंद करतील तेव्हा विद्यार्थ्यांना न्याय मिळेल”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
” लोकसेवा आयोगाची जी रचना आहे ती अत्यंत राजकीय स्वरुपाची आहे. कोणते निकष लावून लोकसेवा आयोगावर माणसं नेमली जातात याची एक आचार संहिता आहे. आज लोकसेवा आयोगाचं पूर्णपणे अध:पतन झालेलं आहे. स्पर्धा परिक्षा घेणाऱ्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या सगळ्यांच्या बाबतीत हे म्हणता येईल. या देशातलं कोणतंही विद्यापीठ, कोणतीही संस्था यावर नेमलेली माणसं आपण पाहिली तर ती सगळी माणसं एका राजकीय विचाराची आहेत. त्यांची त्या पदावर बसण्याची अजिबात कुवत नाही. पूर्वी आम्हाला लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ते माहित असायचं कारण तेवढी महत्त्वाची व्यक्ती त्या पदावर असायची. आज ते नाहीये. आज हजारो विद्यार्थी लोकसेवा आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्राचं सरकार नेहमीप्रमाणे कमिटी स्थापन करतायत. या अशा कमिट्यांनी काय होणार आहे. मूळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काही बाबतीत तरी निष्पक्ष राहायला हवं. काही संविधानिक संस्थांमध्ये आपल्या मर्जीतील माणसं घुसवण्याचं काम बंद करतील त्या दिवशी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. दुर्दैवाने या महाराष्ट्रात आज तसं नाहीये”, असी टीका संजय राऊत यांनी केली.
”यशवंतराव चव्हाणांच्या काळात सुरू झालेला लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा अत्यंत धुळीस मिळालेली दिसते. आता त्या विद्यार्थ्यांशी चर्चा करायला परत चंपतरायलाच पाठवणार का? मोदी काल याच विद्यार्थ्यांना दिमागी नक्षल म्हणाले. जे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आपल्या हक्कासाठी त्यांना मोदी हसत हसत दिमागी नक्षल म्हणाले. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि मोदी हसत हसत त्यांना दिमागी नक्षल म्हणतायत. कसं काय होणार या देशाचं? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनावरून विरोधी पक्षावर केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ”विरोधी पक्षाचं काम काय आहे? गाडीवर पुरावे घेऊन नाटकं कोणी केली. कोण राजकारण करतं? या सरकारमधले अनेक लोकं असे आहेत जे विरोधी पक्षाचे नेते होते. जेव्हा जेव्हा सरकारविरोधात जनता रस्त्यावर उतरली तेव्हा तेव्हा या नेत्यांनी त्या जनतेचं नेतृत्व केलं आहे. कोरोना काळात माणसं मरत होती, इस्पितळात धावत होती. हाहाकार झाला होता सगळीकडे. त्याचं राजकारण सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यामुळे राजकीय हत्यार वगैरे हे शब्द वापरू नका”, असे संजय राऊत म्हणाले.
























































