अष्टमीला पुरी अन् नवमीला मटण खाणारच; आम्ही काय खायचे ते बाहेरून आलेल्या बाबाने शिकवू नये; भाजप प्रदेशाध्यक्षांचा धीरेंद्र शास्त्रींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानामुळे पश्चिम बंगालमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. दुर्गापूजा उत्सवादरम्यान लोकांनी मांसाहार करू नये, असे आवाहन करत असे करणाऱ्यांना शास्त्रींनी पाखंडी म्हटले होते. या विधानावर भाजपचे पश्चिम बंगाल प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांनी टिका केली आहे. कोणी काय खावे किंवा काय घालावे हे कोणीही ठरवू शकत नाही; बंगाली लोक जे नेहमी खात आले आहेत, तेच खातील, असे ते म्हणाले.

दुर्गापूजेच्या काळात खाण्यापिण्याच्या परंपरा शतकानुशतके चालत आल्या आहेत. अष्टमीला बंगाली लोक लुची अर्थात पुरी खातात आणि नवमीला मटण. त्यामुळे ते तेच खात राहतील, असे समिक भट्टाचार्य म्हणाले. तसेच शास्त्रींच्या विधानाला महत्त्व द्यायचे की नाही, हा पूर्णपणे बंगाली जनतेचा वैयक्तिक प्रश्न असून यात कोणतेही राजकारण नाही, असेही त्यांनी नमूद केले.

स्वामी विवेकानंद यांच्यापेक्षा कुणी मोठे नाही

आजकाल शाकाहाराचा प्रचार केला जातो आणि अनेक डॉक्टरही त्याचा सल्ला देतात. पण तुम्ही घरात काय खाता हे एखादा बाबा किंवा राजकीय पक्ष ठरवणार का? बंगाली लोक मासे आणि मटण खाणार नाहीत का? अगदी स्वामी विवेकानंद यांनीही याला संमती दिली होती आणि बंगालमध्ये स्वामीजींपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. येथे काली मातेलाही मटणाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे अशा विचारांना स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही भट्टाचार्य ठामपणे म्हणाले.

बंगाली लोकांनी जसे आहे तसेच राहावे

धीरेंद्र शास्त्री यांनी एक आवाहन केले आहे आणि तसा अधिकार प्रत्येकाला आहे. जसे लोक नशा सोडण्याचे आवाहन करतात, तसेच हे आहे. दररोज चरबी असणारे मटण खाणे आरोग्यासाठी चांगले नाही, असा विचार कोणीही करू शकतो. पण त्यांनी जे सांगितले त्यावर वाद निर्माण करण्याची गरज नाही. बंगालच्या लोकांनी जसे आहे तसेच राहावे, अशी सारवासारवही त्यांनी केली.

तृणमूल काँग्रेसचा भाजपवर निशाणा

दरम्यान, याच मुद्द्यावरून तृणमूल काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शुभेंदू अधिकारी यांनी बागेश्वर बाबांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर त्यांनी बंगालमध्ये दुर्गापूजेदरम्यान मांसाहारावर बंदी घालण्याची भाषा केली. बंगाली लोकांच्या ताटातून मासे आणि मटण काढून घेण्याचा हा भाजपचा नियोजित कट आहे का? म्हणूनच पूजेपूर्वी उपाहारगृहांवर छापे टाकले जात आहेत का? असा सवाल तृणमूल काँग्रेसने केला.