
MPSC च्या पेपरफुटीप्रकरणी राज्य सरकारने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या प्रकरणी एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा लावून काम वाढवलं आहे अशी टीका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच गेली 10 वर्ष या राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे एकछत्री राज्य आहे तरी विद्यार्थ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पेपरफुटीसारखी प्रकरणं होतात असेही संजय राऊत म्हणाले.
नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, इतकं मोठं सरकार आहे, इतके महान गृहमंत्री आहेत. त्यानंतर एक भक्कम सरकर आहे, मंत्री आहेत तरीही वारंवार पेपर फुटतात. याविरोधातच पुण्यात आणि इतरत्रही लोक रस्त्यावर उतरले. सरकारवर टास्क फोर्स नेमण्याची वेळ का आली? गेल्या एक 10 वर्षांपासून या राज्यावर देवेंद्र फडणवीस यांचे एकछत्री राज्य आहे. तरीही विद्यार्थ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे पेपरफुटीसारखी प्रकरणं या राज्यात होतात. दुर्दैवाने मला सांगावसं वाटतंय की, नीट असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो या सगळ्या पेपरफुटीच्या प्रकरणात भाजपचे कार्यकर्ते अडकलेले आहेत. युपीएससी प्रकरणात पुणे आणि लातुरातून जे पकडले गेले, हे सर्व लोक भाजपसंबंधित लोक आहेत. सरकारने याप्रकरणी टास्कफोर्स नेमला आहे. हा टास्कफोर्स नेमका काय करणार आहे? एका यंत्रणेवर दुसरी यंत्रणा लावून काम वाढवलं जात आहे. यापूर्वीसुद्धा कोणत्याही टास्कफोर्स शिवाय लोकसेवा आयोगाचं पेपर सेटिंग आणि भरती प्रक्रिया चालायची, असेही संजय राऊत म्हणाले.
पश्चिम बंगाल आणि नागपुरात डीजे बंदी करण्यात आली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांचं सरकार राहिलेलं नाही. हीच डीजे बंदी जर ममता बॅनर्जी यांनी केली असती तर त्यांना हिंदुविरोधी ठरवलं असतं. नागपुरातही डीजेवर मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, नागपुरातच संघाचं मुख्यालय आहे. त्यामुळे पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. पण डीजे, प्लास्मामुळे सामान्य लोकांना त्रास होतो. मेंदुवर आणि हृदयावर डीजेचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे या डीजेविरोधात संपूर्ण देशभरात एक मार्गदर्शक सूचना जारी व्हायला पाहिजे आणि त्याचे पालन झाले पाहिजे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.


























































