
मित्रासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या रागातून २२ वर्षीय तरुणीची तिच्याच वडील आणि भावाने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोफिया फारूक असे मृत तरुणीचे नाव असून, आरोपींनी ही हत्या अपघातासारखी भासवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी तपास करून वडील मोहम्मद फारूक नवाबखान (५६) आणि भाऊ हाबिल फारूक (३८) यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
सोफिया अहमदाबादमधील जुहापुरा येथील एका रुग्णालयात रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १२ ऑगस्टच्या रात्री हाबिल आणि सोफिया दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याची माहिती सुरुवातीला पोलिसांना देण्यात आली होती. या घटनेत डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने सोफियाला सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे १३ ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
एम डिव्हिजन ट्रॅफिक पोलीस निरीक्षक यू. बी. धाकडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान अपघाताचा बनाव पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचल्याचे निष्पन्न झाले. सुमारे तीन महिन्यांपूर्वी सोफियाचा तिच्या मित्रासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरून घरात मोठा वाद झाला होता आणि कुटुंबाची समाजात बदनामी झाल्याचा राग वडील व भावाच्या मनात होता.
याच रागातून दोघांनी सोफियाच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या रात्री आरोपी तिला दुचाकीवरून सरखेजजवळील घेलजीपुरा येथील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. तिथे हाबिलने सोफियाच्या डोक्यात हातोड्याने वार केले, ज्यामध्ये वडिलांनीही त्याला साथ दिली. त्यानंतर तिला रस्त्यावर आणून अज्ञात वाहनाने धडक दिल्याची खोटी तक्रार नोंदवली.
सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनी वडील आणि मुलावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.




























































