केरळममध्ये विवाह सोहळ्यांची धामधूम; गुरुवयूर मंदिरात एकाच दिवशी पार पडणार 400 हून अधिक लग्नं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळममधील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात येत्या 13 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी विक्रमी विवाह सोहळे पार पडणार आहेत. मल्याळम ‘चिंगम’ महिन्यातील शेवटचा रविवार हा विवाहासाठी अत्यंत शुभ मानला जात असल्याने देवसोम बोर्डाच्या माहितीनुसार आतापर्यंत 409 विवाह सोहळ्यांची आगाऊ नोंदणी झाली आहे.

मुहुर्ताच्या आदल्या दिवसापर्यंत विवाहासाठी नोंदणी सुरू राहणार असल्याने हा आकडा आ णखी वाढण्याची दाट शक्यता आहे. या विवाह सोहळ्यांच्या पार्श्वभूमिवर होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन देवसोम बोर्डाने पोलिसांच्या सहकार्याने भाविकांना सुलभ दर्शन आणि विवाह सोहळे सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे.

मंदिरात होणारी मोठी गर्दी आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेता, मंदिर परिसर तसेच संपूर्ण शहरात अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात केला जाणार आहे. सर्व विवाहांचे वेळीच नियोजन व्हावे यासाठी सकाळी 4 वाजल्यापासूनच विधींना सुरुवात होईल. ‘थालीकेट्टू’ (लग्नगाठ बांधणे) या विधीसाठी सहा स्वतंत्र मंडप उभारण्यात आले असून विधी पार पाडण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत.

लग्न समारंभात होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी आणि भाविकांच्या रहदारीसाठी मंदिराचा पूर्व प्रवेशद्वार पूर्णपणे ‘वन-वे’ केला जाणार आहे. तसेच परिसरामध्ये पारंपारिक वाद्य वाजवणारे पथकही तैनात केले जाईल. मंदिराच्या आतील व बाहेरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे कार्यरत ठेवण्यात येणार असून 24 तास कडक बंदोबस्त ठेवला जाईल. याशिवाय, असामाजिक कृत्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा देवसोम बोर्डाने दिला.