
ठाणे महापालिकेच्या ‘विघ्नसंतोषी’ कारभाराचा फटका शेकडो मंडळांना बसण्याची शक्यता आहे. अवघ्या चार दिवसांवर बाप्पाचे आगमन आले असताना पालिकेने आतापर्यंत २८२ अर्जदारांपैकी केवळ ८० मंडळांनाच मंडप उभारण्यासाठी परवानगी दिली असून २०२ अर्ज धूळखात पडले आहेत. परवानगीसाठी मंडळाचे पदाधिकारी रोजच पालिकेचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र प्रशासनाच्या धिम्या कारभाराचा जोरदार फटका या मंडळांना बसत आहे. त्यामुळे परवानगी मिळणार कधी आणि आम्ही मंडप उभारून सजावट करणार कधी, असा सवाल मंडळांनी केला आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असताना ठाणे महापालिकेच्या मंडप परवानगी प्रक्रियेला अपेक्षित वेग आलेला नाही. ठाणे शहर, वागळे इस्टेट, कोपरी, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील २८२ गणेश मंडळांनी मंडप उभारणीसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत. त्यापैकी फक्त ८० अर्जाना मंजुरी मिळाली असून उर्वरित अर्ज पेंडिंग ठेवण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे पालि का प्रशासनाकडून मंडप परवानगी उशिरा मिळत असल्याने पालिका, पोलीस आणि वाहतूक विभागाच्या समन्वयाअभावी परवानगी मिळण्यास विलंब होत असल्याचे गणेश उत्सवाच्या तयारीत असलेल्या मंडळांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागणार
मंडप उभारणीसाठी महापालिकेची परवानगी मिळाल्यानंतर वाहतूक, अग्निशमन आणि इतर संबंधित विभागांच्या नियमांची पूर्तता करावी लागते. त्यामुळे परवानगीला होणाऱ्या विलंबामुळे तयारीसाठी शेवटच्या क्षणी धावपळ करावी लागणार आहे. उत्सव जवळ येत असताना प्रलंबित अर्जाचा तातडीने निपटारा करण्याची मागणी गणेश मंडळांकडून होत आहे.
एक खिडकी योजनेचा फज्जा
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणी, वीज जोडणी, वाहतूक आणि पोलिसांच्या परवानग्या एकाच छताखाली सहज मिळाव्यात म्हणून प्रशासनातर्फे एक खिडकी योजना राबवली जाते. मात्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या योजनेचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- यंदा मंडप परवानगीसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आले. महापालिकेकडे १४५ ऑनलाईन आणि १३७ऑफलाईन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र अर्जाची संख्या आणि इतर मिळालेल्या परवानग्यांमध्ये मोठी तफावत असल्याने शेवटच्या टप्प्यात महापालिका प्रशासनावर मंजुरीचा मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
- वर्तक नगरमध्ये ३८ पैकी ३३ अर्ज मंजूर झाले असून केवळ पाच अर्ज प्रलंबित आहेत. माजिवडा-मानपाडा येथे ५५ पैकी ४२ अर्जाना मंजुरी मिळाली आहे. तसेच लोकमान्य नगरमध्ये ३६ पैकी १३, उथळसरमध्ये ३८ पैकी १७ आणि नौपाडा-कोपरीमध्ये ३१ पैकी ११ अर्ज मंजूर झाले आहेत. कळवा येथे २३पैकी फक्त सात अर्जाना मंजुरी मिळाली आहे. दिव्यात १७पैकी केवळ दोन अर्ज मंजूर झाले. मुंब्रा येथे नऊपैकी तीन अर्ज मंजूर झाले आहेत.


























































