Ratnagiri News – देवरुखच्या सावकर चौकात भला मोठा अजगर; हेल्प फोर्स’च्या रक्षकांनी शिताफीने पकडून दिले वनविभागाच्या स्वाधीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या सावकर चौकातील हॉटेल प्रभाच्या मागे, रेस्ट हाऊस शेजारी आज गुरुवारी सकाळी एका भला मोठ्या अजगराचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, नागरिक घाबरण्याच्या आतच वन्यजीव रक्षक तत्परतेने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या अजगराला सुरक्षितपणे जेरबंद केले.


मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी रेस्ट हाऊसच्या शेजारील परिसरात स्थानिकांना एक भला मोठा अजगर दिसून आला. अचानक मिळालेल्या या दर्शनाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटना समजताच ‘हेल्प फोर्स’चे वन्यजीव रक्षक आर्य बेर्डे आणि प्रमोद पुसाळकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

​स्थानिकांच्या आणि स्वतःच्या सुरक्षेची खबरदारी घेत आर्य बेर्डे व प्रमोद पुसाळकर यांनी अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने या विशाल अजगराला पकडले. अजगराला पकडल्यानंतर त्याला कोणतीही दुखापत होणार नाही याची दक्षता घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

​‘हेल्प फोर्स’च्या या दोन्ही रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे सावकर चौकातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे देवरुख शहरात कौतुक होत आहे.