
नेपाळमध्ये 26 ऑगस्ट रोजी आलेल्या महाप्रलयातील मृतांचा आकडा 1,377 वर पोहोचला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये सातत्याने मृतदेह बाहेर काढले जात आहेत, तर 5,130 लोक अजूनही बेपत्ता आहेत. सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक पूरग्रस्त जिल्ह्यांत सतत शोध आणि बचाव कार्य रावबत आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDRRMA) माहितीनुसार, आतापर्यंत पूरग्रस्त भागातून 13,656 लोकांना वाचवण्यात आले आहे.
नेपाळमधील चितवन जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून, आतापर्यंत येथे 364 मृतदेह सापडले आहेत. नवलपरासी पूर्वमध्ये 228 आणि नवलपरासी पश्चिममध्ये 222 मृतदेह सापडले आहेत.
नुवाकोटमध्ये 198, रसुवामध्ये 178, गोरखामध्ये 77, धादिंगमध्ये 70 आणि तनहुनमध्ये 38 मृतदेह सापडले आहेत. याव्यतिरिक्त, काठमांडूमध्ये उपचारादरम्यान दोन पूरग्रस्तांचा मृत्यू झाला. पूरग्रस्त भागांमध्ये ढिगाऱ्यांखाली आणि नदीच्या आसपास बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे.

























































