चाकरमानी चालले गावाला, आज आणि उद्या एसटीच्या 5453 गाड्या कोकणात जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पुढील दोन दिवसांत 2 लाख 50 हजारांहून अधिक चाकरमानी ‘लालपरी’ अर्थात एसटीच्या बसगाड्यांतून कोकणचा रस्ता धरणार आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी तब्बल 5453 एसटी गाड्या मुंबई, ठाणे, पालघर भागातून कोकणातील गावागावांच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. त्यामुळे येत्या ‘विकेण्ड’ला मुंबई-गोवा महामार्गावर खासगी गाड्यांबरोबरच ‘लालपरी’चा लाल ठसा दिसणार आहे.

गणेशभक्तांच्या सोईसाठी एसटी महामंडळाने यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक गाड्यांची व्यवस्था केली आहे. परराज्यांतून गाड्या मागवून कोकणवासीयांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी एसटीच्या गाड्यांना सर्वाधिक मागणी आहे. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नवीन लालपरी-2427 आणि जिजाऊ गाड्या- 601 अशा एकूण 3028 गाड्या कोकणच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्याचबरोबर शनिवारी नवीन लालपरी-2149 आणि जिजाऊ गाड्या-276 अशा एकूण 2425 गाड्या मुंबई आणि ठाण्यातून सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील गावांमध्ये रवाना होणार आहेत. 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या कालावधीत एसटीच्या एकूण 5743 गाड्या गणेशभक्तांनी आरक्षित केल्याची माहिती एसटी महामंडळाचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी दिली.