
तान्हा पोळ्यानिमित्त महागाव फुलसावंगी येथील पुणेश्वर मंदिराच्या पायथ्याशी आयोजित यात्रेत शुक्रवारी दुपारी भयंकर दुर्घटना घडली. आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकल्याने केसांसह डोक्याची चामडी निघाल्याने महिला गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे यात्रास्थळी एकच खळबळ उडाली. बाली मारोती टाळीकोटे (25) असे जखमी महिलेचे नाव आहे.
फुलसावंगी येथील बाली टाळीकोटे या आकाश पाळण्यात बसल्या होत्या. पाळणा सुरू असताना अचानक त्यांचे केस बेरिंगमध्ये अडकले. पाळणा सुरू असल्याने काही क्षणांतच केस जोराने ओढले गेले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
घटना लक्षात येताच उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभुरे आणि जमादार सुहास कायटे यांनी नागरिकांच्या मदतीने तातडीने पाळणा थांबवला. जखमी महिलेला पाळण्यातून बाहेर काढून त्वरित रुग्णवाहिका बोलावण्यात आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुसद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते.




























































