
दापोली तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या तक्रारी दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या अडीच महिन्यात पॉक्सो अंतर्गत सहा गुन्हे दाखल झाल्याने आणि आरोपी जामिनावर सुटल्याने दापोलीतील बालिका, युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील एका 16 वर्षीय मुलीशी अदनान लियाकत कोळथरकर (40) याने ओळख केली. यानंतर तिच्याशी फेब्रुवारी 2026 ते 18 ऑगस्ट 2026 या कालावधीत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार पीडित मुलीच्या नातेवाईकांनी 9 सप्टेंबर रोजी दापोली पोलीस स्थानकात दाखल केली. या तक्रारीवरून संशयित अदनान लियाकत कोळथरकर याच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(1),(2) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 4,6,8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.
दुसऱ्या प्रकरणात घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी प्रमोद भिकू लोवरे याने 8 वर्षाच्या मुलीशी मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. संशयित प्रमोद भिकू लोवरे याच्याविरोधात दापोली पोलीस स्थानकात भारतीत न्याय संहितेच्या कलम 75(2) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ करत आहेत.




























































