
गावागावांत मूलभूत सुविधांचा विकास झाल्याचे दावे होत असले, तरी राजापूर तालुक्यातील सागवे-वडपवाडी ग्रामस्थांना आजही स्मशानभूमीत जाण्यासाठी नदीपात्रातूनच वाट काढावी लागत आहे. तब्बल तीन वर्षांपूर्वी याच समस्येवर ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध झालेला नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय अद्याप कायम आहे.
वडपवाडी येथील ग्रामस्थांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जाण्यासाठी नदीपात्रातून पाण्यातून वाट काढत मृतदेह न्यावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यास ही समस्या अधिक गंभीर बनते. मृतदेह खांद्यावर घेऊन पाण्यातून मार्गक्रमण करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत असल्याने अंत्यविधीच्या प्रसंगी मोठी कसरत करावी लागत आहे.
सागवे-वडपवाडी परिसरात पावसाळ्यात नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढते. अशा वेळी मृतदेह नदीपात्रातून नेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. वृद्ध व्यक्ती, महिला तसेच अंत्यविधीसाठी उपस्थित ग्रामस्थांनाही पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित व बारमाही रस्ता असणे ही ग्रामस्थांची मूलभूत गरज आहे. ग्रामस्थांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन स्मशानभूमीकडे जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्त्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. विकासकामांच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना एखाद्या गावातील नागरिकांना मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नदीच्या पाण्यातून न्यावा लागणे ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. आता तरी संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून स्मशानभूमीचा रस्ता मार्गी लावावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.




























































