पालघरमध्ये डॉक्टरला शिवीगाळ, कर्मचाऱ्यावर हल्ला प्रकरण; शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावीत यांचा मुलगा पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी फरार असलेला शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पोलिसांनी मीरा-भाईंदरमधून ताब्यात घेतले. तसेच निलंबित युवासेना प्रमुख साईराज पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गोविंदा पथकातील तब्बल 12 जणांना अटक केली. अटक आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रोहित गावीत आणि साईराज पाटील यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा पथकातील सदस्यांवर रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. यादरम्यान काही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात घुसले. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण केली. याप्रकरणी पालघर पोलिसांत एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी शिवसेनेचा निलंबित शहरप्रमुख राहुल घरत याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. राहुल घरत सध्या पोलीस कोठडीत आहे. तपासादरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील राड्यात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गोविंदा पथकातील 12 सदस्यांना शुक्रवारी अटक केली. रोहित गावित याचेही एफआयआरमध्ये नाव असून तो फरार होता. रोहित मीरा-भाईंदरमधील राजेंद्र गावित यांच्या मालकीच्या घरात लपून बसला होता. मात्र मोबाईलमधील सिमकार्डमुळे रोहित पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

रोहितने मोबाईलमधून जुने सिमकार्ड काढून नवीन सिमकार्ड घातले आणि पोलिसांनी तांत्रिक तपास करत त्याला गाठले. रोहितसह शिंदे गटाचा निलंबित कार्यकर्ता साईराज पाटील यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल झालेला शिंदे गटाचा निलंबित जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शुभम बांदिवडेकर आणि नगरसेवक नीलम संखे अद्याप फरार आहेत. तिघांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर 15 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

तपास अधिकाऱ्यांची तीनदा बदली

रुग्णालयातील राडा प्रकरणाचा तपासही चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्याकडे तपास होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पालघरचे पोलीस उपअधीक्षक उमेश गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला. पुढे हा तपास डहाणूच्या पोलीस उपअधीक्षक निशा जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून सध्या त्या तपास अधिकारी आहेत.