पुण्यातील बुधवार पेठेत 38 लाखांचा खवा-पनीर जप्त, ऐन गणेशोत्सवापूर्वी ‘एफडीए’ची धडक कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाला अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक राहिले असताना बुधवार पेठेत 38 लाखांचा खवा-पनीर जप्त करण्यात आला आहे. पुण्यात शुक्रवारी भेसळयुक्त खवा आणि पनीरविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. मोहिमेत बार्शीहून आलेला तब्बल 4 हजार 600 किलो खवा नष्ट करण्यात येत असून कर्नाटकातून आलेल्या 12 हजार 500 किलो पनीरचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

पुण्याच्या बाजारपेठेत पहाटेपासूनच कर्नाटक भागातून पनीरचे ट्रक येतात. त्यानंतर शहरातील विविध डेअरी उद्योगांमध्ये ते वितरित केले जातात. मात्र शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासूनच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ परिसरात डेरेदाखल झाले होते. ट्रकमधून आलेला माल दुकानात जाण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तो ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या कारवाईत बार्शी येथून पुण्यात आलेला तब्बल 4 हजार 600 किलो खवा अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. या धडक कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे 12 ते 13 अधिकारी सक्रिय आहेत. कर्नाटक आणि बार्शी या भागांतून पुण्यात येणाऱया खवा व पनीरच्या साठय़ांची तपासणी करण्यात येत आहे.