
विशेष सखोल फेरतपासणी ‘एसआयआर’चा पहिला टप्पा पार पडल्यानंतर कर्नाटकातील प्रारूप मतदार यादीसह नोटीस यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नोटीस यादीत अनेक प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या व्यक्तींची नावे दिसत नाहीत. प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी आणि त्यांचे कुटुंबीय, ‘झीरोदा’चे संस्थापक नितीन कामत व निखिल कामत यांची नावे नसल्याची माहिती मिळाली आहे. इतकेच नव्हे, तर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची आई गौराम्मा यांचेही नाव प्रारूप यादीत नाही.
झीरोदाचे कामत बंधू आणि त्यांची आई रेवती कामत यांची नावे वगळण्यामागील कारण पालकांचे नाव जुळत नाही असे आहे. या तिघांची नावे बंगळुरू दक्षिण विधानसभा मतदारसंघात होती. कन्नड अभिनेते शिवा राजकुमार यांचे नाव 2002 च्या यादीशी मॅपिंग न झाल्यामुळे त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस काढण्यात आली असली तरी ती बजावलेली नाही, असे अधिकाऱयांनी सांगितले.
नंदन निलेकणी, त्यांची पत्नी रोहिणी आणि मुले जान्हवी व निहार यांची नावे 2002 च्या यादीबरोबर मॅपिंग न झाल्यामुळे प्रारूप यादीबाहेर आहेत. विशेष म्हणजे नंदन निलेकणी हे आधारकार्ड विकसित करणाऱ्या ‘युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया’चे 2009 ते 2014 या कालावधीत संस्थापक अध्यक्ष होते.


























































