अहिल्यानगर, भंडारा, नांदेडमध्ये वाहनांची भीषण टक्कर, राज्यात तीन अपघातांत 21 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड या तीन जिह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत 21 जणांचा मृत्यू झाल्याने अवघा महाराष्ट्र हादरला आहे.

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीपसमोर आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची भीषण समोरासमोर धडक झाली. या अपघातात वॅगनरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर नांदेड-भोकर मार्गावर सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ट्रक आणि पिकअप वाहनात समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. सर्वत्र पोळा साजरा केला जात असताना भोकर तालुक्याला मात्र एका भीषण अपघाताच्या घटनेला सामोरे जावे लागले. आठ जणांच्या मृत्यूने भोकरमध्ये शोककळा पसरली आहे.

नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर पिंपळगाव सडक येथील एका ढाब्याजवळ ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान बालकांचाही समावेश आहे. या अपघातात एकूण 9 जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा येथे उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली. या अपघातात आठ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तन्मय पटेल, मयंक पटेल, रमय्या पटेल, गणेशा पटेल, ललिता पटेल, बारी पटेल, अशी मृतांचा नावे आहेत. ट्रकमध्ये पूर्णपणे अडकलेली चारचाकी बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीची मदत घ्यावी लागली.