मोहम्मद शमीची संघात परतण्याची धडपड सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या संघातून सध्या बाहेर असलेल्या अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची आशा सोडलेली नाही. वयाच्या 36 व्या वर्षीही शमीने स्वतःला प्रेरित ठेवत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. ‘हिंदुस्थानच्या संघात पुनरागमन करण्यासाठी मी धडपड करत आहे. तुमचा पहिला सामना असो किंवा 100 वा, याने काही फरक पडत नाही. तुमचे प्रयत्न आणि विचार एकसारखे असले पाहिजेत’, अशी भावना शमीने व्यक्त केली आहे.

शमीने मार्च 2025 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. पूर्व विभागाच्या विजयानंतर शमी म्हणाला, स्वतःला प्रोत्साहित ठेवण्याची अनेक कारणे आहेत. तुम्ही ज्या मैदानावर जाता तिथून सकारात्मक गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा. या स्तरावर जर तुम्ही स्वतःला प्रेरित करत नसाल तर तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे.’

13 वर्षांनंतर पूर्व विभाग चॅम्पियन

दुलीप ट्रॉफीतील विजेतेपद शमीसाठी विशेष ठरले. हा त्याचा 100 वा प्रथम श्रेणी सामना होता. पूर्व विभागाने तब्बल 13 वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात शमीने 16 षटकांत पाच निर्धाव षटकांसह 42 धावा देत दोन विकेट घेतल्या.

न्यूझीलंड दौऱयात पुनरागमनाची संधी

मोहम्मद शमीची आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत पुनरागमनाची शक्यता कठीण मानली जात आहे, मात्र न्यूझीलंड दौऱयासाठी त्याच्याकडे पुनरागमनाची संधी असू शकते. हिंदुस्थानचा संघ न्यूझीलंड दौऱयावर 4 ते 15 नोव्हेंबरदरम्यान वन डे मालिका खेळणार आहे. 2027 च्या वन डे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. शमीची निवड झाल्यास जसप्रीत बुमराहसोबत वेगवान गोलंदाजीची धार वाढू शकते.