कर्जमुक्ती योजनेत 3 लाख 55 हजार शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर, ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त आधार प्रमाणीकरण करण्याची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण 3 लाख 55 हजार 614 शेतकऱ्यांचा समावेश आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यादीतील शेतकऱयांनी 31 मार्च 2026 रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण 31 लाख 17 हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या 16 लाख 96 हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केली होती. पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 12 लाख 58 हजार शेतकऱयांच्या कर्ज खात्यांवर 10 हजार 114 कोटी 90 लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

दुसऱ्या यादीतील विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या

छत्रपती संभाजीनगर :1 लाख 95 हजार 899
अमरावती : 71 हजार 796
नागपूर : 34 हजार 520
नाशिक: 25 हजार 471
पुणे ः 23 हजार 117
कोकण ः 4 हजार 811

पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.
बाबासाहेब पाटील, सहकार मंत्री