
शाखीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याच्यासह पाच आरोपींविरोधात कल्याण न्यायालयात आज दोषारोप निश्चित झाले. या खटल्याची सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.पी. वासाडे यांनी दिले. १५ सप्टेंबरपासून या खटल्याच्या नियमित सुनावणीस प्रारंभ होणार असून सरकारी पक्षाकडून कागदपत्रे आणि साक्षीदारांचे म्हणणे मांडले जाणार आहे.
शिंदे गटाचा कोपर विभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे आज कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाला. कोणताही सुरक्षेचा ताफा व लवाजमासोबत नसलेल्या म्हात्रेने अशिल व वकिलांच्या गर्दीतूनच आरोपी प्रमोद निकम, रमेश पवार, अक्षय कोरडे आणि साधना कारंडे या साथीदार आरोपींसह न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या कोर्टात सकाळी ९.३० वाजता हजेरी लावली. त्याने तोंडाला मास्क लावला होता. सुनावणीत आरोपींच्या वतीने तीन वकिलांनी संयुक्तपणे युक्तिवाद केला. दोषारोप पत्र मोठे, अनेक पानांचे असून त्याचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी म्हात्रे याच्या वकिलांनी केली.
या प्रकरणातील सरकारी पक्षाने सादर केलेल्या कागदपत्रांसह साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर करण्याची प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी पक्षाकडून कागदपत्रे व साक्षीदारांची यादी सादर झाल्यानंतर कोणती कागदपत्रे मान्य आहेत आणि कोणत्या कागदपत्रांवर आक्षेप आहे. याबाबत आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे. मात्र या प्रकरणाची सुनावणी अनावश्यकपणे लांबवू नये, अशी न्यायालयाची भूमिका असल्याचे स्पष्ट झाले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या कालावधीत प्रकरणाचा निकाल देण्याचे उद्दिष्ट असल्याचे न्यायाधीश एन.पी. वासाडे यांनी नमूद केले. त्यामुळे सुनावणी लांबणीवर न टाकता लागोपाठ तारखा देऊन खटला पुढे नेण्याचे संकेत न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात रमेश म्हात्रे यांच्यासह पाच आरोपींवर गंभीर आरोप करण्यात आले असून दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे. आता १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नियमित सुनावणीत सरकारी पक्षाकडून कागदपत्रे आणि साक्षीदारांचे म्हणणे मांडले जाणार आहे.
रमेश म्हात्रेची महासभेत हजेरी
दरम्यान आज रमेश म्हात्रे याने कल्याण न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कल्याण महापालिका मुख्यालयात सर्वसाधारण महासभेत हजेरी लावली. सुमारे पंधरा मिनिटे तो महासभेमध्ये उपस्थित होता.
























































