भूमिपुत्रांना कॉर्पोरेट कंपन्यांनी नोकऱ्या दिल्याच पाहिजेत, शिव संचार सेनेची मोहीम; संचार जॉब पोर्टलवर भरतीची माहिती देण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना संलग्न शिव संचार सेनेने स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून बनवलेल्या ‘संचार जॉब पोर्टल’ची माहिती कॉर्पोरेट कंपन्यांना देण्यासाठी आजपासून मोहीम हाती घेतली. भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्याच पाहिजेत असा संदेश या मोहीमेतून देण्यात येत आहे.

शिव संचार सेनेचे अध्यक्ष अखिल चित्रे आणि पदाधिकाऱ्यांनी अनेक कंपन्यांना भेटी देऊन या पोर्टलबद्दल माहिती दिली तसेच आगामी नोकरभरतीबाबत या पोर्टलवर माहिती द्यावी असे सांगितले. अनेक कंपन्यांनी ‘संचार जॉब पोर्टल’चं काwतुक करत भरतीची माहिती ह्या पोर्टलवर देण्याचे आश्वासन दिले. काही कॉर्पोरेट कंपन्यांनी दिल्ली, बंगळुरूमधील मुख्यालयातून परवानगी घ्यावी लागेल असे कारण पुढे केले. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आणि महाराष्ट्रात कंपन्या चालवायच्या असतील तर येथील भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य द्यावेच लागेल अशी तंबी व्यवस्थापनाला दिली.

हे पोर्टल पूर्णपणे विनामूल्य आहे. कंपन्यांनी या पोर्टलवर नोकरीचे पद, रिक्त जागांची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये, कामाचा अनुभव, नोकरीचे ठिकाण, पगार/मानधनाची श्रेणी, अर्ज प्रक्रिया, संपर्क आदी तपशील अपलोड करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. मराठी मुलांना भरती करायचे नसेल तर तसे कारण स्पष्ट करणारा फीडबॅक अर्जही या पोर्टलवर कंपन्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. [email protected] हा ई-मेल आणि 9619338734 हा हेल्पलाईन नंबरही शिव संचार सेनेने दिला असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली.