चिंचोली लिंबाजीत भावा-बहिणीचा मृत्यू; खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिंचोली लिंबाजी येथे घरी बनविलेली खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना चिंचोली लिंबाजी येथे घडली. आयुष नारायण थोटे (२) याचा गुरुवार, १० रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असलेल्या गायत्री नारायण थोटे (७) हिचाही शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे थोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नारायण साहेबराव थोटे (३५), त्यांची पत्नी देवशाला (३०), मुलगी गायत्री (७) व मुलगा आयुष (२) यांनी मंगळवारी रात्री घरी तयार केलेली खिचडी खाल्ली होती. त्यानंतर बुधवारी पहाटे चौघांनाही उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर दोन्ही मुलांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गुरुवारी पहाटे आयुष याला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गंभीर प्रकृती असलेल्या गायत्रीला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज तिचा मृत्यू झाला. आई-वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. प्रकृती बिघडण्याचे नेमके कारण काय, याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे. गायत्रीवर शुक्रवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात चिंचोली लिंबाजी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान शुक्रवारी दुपारी एफडीआयचे अन्नसुरक्षा अधिकारी एम. एल. सिद्दिकी, पिशोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शाम गवळी, कॉन्स्टेबल कैलास करवंदे, मोरे यांनी थोटे यांच्या घरी भेट देऊन घरातील विविध वस्तूंचे नमुने घेतले.